महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई- समाजातील उपेक्षित, वंचित, दबलेल्या लोकांवर जेव्हा अन्याय, अत्याचार होतो तेव्हा त्यांच्याकडे सरकार, यंत्रणा, मिडीया लवकर लक्ष देत नाही. त्या लोकांसाठी सोशल मीडिया एक उत्तम मार्ग आहे. आज जरी आम्ही पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलो तरी काही बातम्या आमच्याकडूनही सुटतात. त्याची माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारेच मिळते. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, डोक्यात विचार आहे, सोशल मीडिया फुकट आहे, प्रत्येकजण आता पत्रकार झाला असून प्रत्येकाने बोलले पाहिजे. कारण जोपर्यंत सामान्य माणूस विचार मांडणार नाही, तो पर्यंत सामाजिक बदल, क्रांतीचा हक्क त्याला मिळणार नाही. बदल, क्रांती समाजातील घटक म्हणून आपणच करीत असतो, असे मत मराठवाड्यातील ‘न्यूज 18’ चे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार मराठवाड्यातील ‘न्यूज 18’ चे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांना दिमाखदार सोहळ्यात मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सिध्दार्थ गोदाम बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आली.
आपल्या विस्तारित भाषणात बोलताना सिध्दार्थ गोदाम म्हणाले की, सोशल मीडिया काय करु शकतो ? हे मागच्या 10 वर्षाच्या काळात जर आपण केंद्रांत ज्यांचं सरकार विराजमान आहे, त्यांच्याकडे पाहिल्यास लक्षात येईल. त्यांनी त्याचा वापर पुरेपूर केला. आपण सुध्दा आधुनिक जे काय चाललयं ते बघितले पाहिजे, वाचले पाहिजे, वापरले पाहिजे आणि इतरांना सांगितले पाहिजे. त्याशिवाय समाजात बदल होणार नाहीत, असेही सिध्दार्थ गोदाम यांनी सांगितले. समाजात आता विचार होताना दिसत नाही, ही खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे. समाजातील आर्थिक, सामाजिक, राजकीय समतोल बिघडत गेले तर बीड सारख्या घटना इतर राज्यातही घडायला वेळ लागणार नाही. आपण आता सजग व्हायला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींबद्दल बोलायला शिकले पाहिजे, तरच समाजात काही प्रमाणात बदल व्हायला सुरुवात होईल, असेही सिध्दार्थ गोदाम यांनी सांगितले. ‘मूकनायक’ चे उदिष्ट, ध्येय हे माझ्या अंगात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करील असे भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ का सुरू केले ? डॉ. आंबेडकरांनी ‘मूकनायक’ मध्ये केलेले लिखाण आजही कसे समाजातील परिस्थितीवर भाष्य करते याचे सिध्दार्थ गोदाम यांनी आपल्या विस्तारित भाषणात अनेक उदाहरणे दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे म्हणाले की, शब्द आणि लेखणी इतके पॉवरफुल कोणतेही शस्त्र नाही आणि ही लेखणी असते पत्रकाराच्या हातात आणि पत्रकार असतो ‘मूकनायक’. पत्रकार हे समाजातील सत्य शोधत असतो. सत्य शोधणाऱ्या पत्रकारांची समाजाला नितांत गरज असते. समाजातील प्रत्येक माणसाने सत्य स्वीकारण्याची हिम्मत ठेवायला पाहिजे, असे सांगत ‘मूकनायक’ पुरस्कार सिध्दार्थ गोदाम यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच अध्यक्षीय समारोपात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने करीत आहे, असे सांगत ‘मूकनायक’ पुरस्कार प्राप्त सिध्दार्थ गोदाम यांचे अभिनंदन केले.
‘मूकनायक’ दिनाच्या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात यमुना जनार्धन सोनवणे, सय्यद जहीरअली शाह कादरी, ईश्वरी खाडे, कल्याणी तपकिरे, आरती कस्तुरे, अजय होळंबे, साक्षी देशमुख, वंदना राहुल सुरवसे, अमित राजेसाहेब लोमटे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव गणेश जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन परमेश्वर गित्ते यांनी केले. कार्यक्रमात गायक बळीराम उपाडे यांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली.होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे सन्माननीय सदस्य जगन (बापू) सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हातागळे, संभाजी मस्के, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, दत्ता वालेकर, प्रवीण कुरकूट, रवि आरसुडे, रतन मोती यांच्यासह आदी सदस्यांनी प्रयत्न केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ‘मूकनायक’ दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
