महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – अंबाजोगाई लातूर महामार्गावरील बर्दापूर फाटा येथील एक बियर बार फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपयांपेक्षाही अधिक किमतीची दारू लंपास केली. ही घटना ही घटना रविवारी (दि.19) रात्रीतुन घडली.
नरसिंग गुलाब मदने यांचे बर्दापूर फाटा येथे मयूर बियर बार हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता ते नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून घराकडे गेले. त्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या पाठीमागच्या दरवाज्यातून कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी स्टॉक ठेवलेल्या खोलीत जाऊन सोळा लाख 70 हजार रुपये किमतीची दारू चोरली. सोबतच चोरट्यांनी काउंटर मध्ये ठेवलेले नगदी सहा हजार रुपये आणि सीसीटीव्हीचा डिव्हीआर असा एकूण 17 लाख 11 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. सकाळी कामावरील मुलगा हॉटेल उघडण्यासाठी आल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. मदने यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्यांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव करत आहेत.
