लातूर: लातूरच्या नांदेड-बिदर महामार्गावरील एकुर्का रोड येथे टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात आई, दोन विवाहित मुली आणि नातीचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये मंगलाबाई जाधव(वय ४८), प्रतिभा भंडे(वय २४), प्रणिता बिरादार(वय २६) आणि अन्यया भंडे यांचा समावेश आहे. एकुर्का रोड येथील जाधव कुटुंबिय जावयाची कार घेऊन उद्गीरला खरेदी निमित्त जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने कारला समोर जोरदार धडक दिली. यात या चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी तातडीने मदत केली.
